📍 मोहदा, ता. वणी, जि. यवतमाळ
मोहदा गावात विजेचे खांब पडल्यामुळे गावातील टाकीवरील नळ पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची विशेष गैरसोय होत आहे.
सध्या परिसरात उष्ण तापमानाचा मोठा उकाडा असून शेतकऱ्यांच्या पेरणीची धावपळ सुरू आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेला नळ पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, घरगुती कामे आणि इतर गरजांसाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चार दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.गावातील नागरिकांचा आरोप आहे की, गेल्या काही वर्षांपासून मोहदा ग्रामपंचायतीकडून गावाच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाहीत.
प्रशासक म्हणून नेमणूक असलेले सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधावा व नळ पाणीपुरवठा त्वरित पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“उष्णतेचा कहर, पेरणीचे दिवस आणि त्यातच चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









